मित्रांनो सध्या तुमचं वाहन भरताना जेव्हा डोळे पेट्रोल पंपाच्या मीटरकडे जातात, तेव्हा प्रत्येकाला एकच प्रश्न सतावत असतो – कधी होणार दर कमी? तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात घसरले आहेत, आणि याचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवर होऊ शकतो.
कच्चं तेल ६१ डॉलरच्या खाली
ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, जुलै २०२५साठी ब्रेंट क्रूड फ्युचर्सचे दर ०.६१% नी घसरून ६०.६९ डॉलर प्रति बॅरल झाले आहेत. दुसरीकडे, अमेरिकेतील वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूड जून कॉन्ट्रॅक्टसाठी ५७.७३ डॉलर प्रति बॅरलवर आले आहे. ही दरांची पातळी मागील काही महिन्यांच्या तुलनेत खूपच खाली आहे.
दर घसरले का? यामागे दोन मोठी कारणं आहेत.
- अमेरिकेची अर्थव्यवस्था सध्या थोडीशी कमकुवत भासत आहे.
- सौदी अरेबिया सारखे देश कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवण्याच्या तयारीत आहेत.
या दोन्ही गोष्टींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमती कमी होत आहेत.
पेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होतील?
गेल्या वर्षी मार्चमध्ये कच्च्या तेलाचे दर ८४ डॉलर प्रति बॅरल होते, तेव्हा भारतात फक्त २ रुपयांची कपात करण्यात आली होती. सध्या कंपन्या प्रति लिटर १० ते १२ रुपयांचा नफा कमावत आहेत, पण तरीही किरकोळ ग्राहकांपर्यंत त्याचा फायदा पोहोचलेला नाही.
८ एप्रिल रोजी IOC ने पेट्रोलची बेस प्राईस ५४.८४ वरून ५२.८४ रुपये केली होती. मात्र सरकारने उत्पादन शुल्क वाढवून तो फरक भरून काढला. सध्या दिल्लीत पेट्रोल ९४.७७ रुपये आणि डिझेल ८७.६७ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
तज्ज्ञांचं मत काय?
नवी दिल्लीतील वेल्थस्ट्रीट या रिसर्च फर्मच्या सुगंधा सचदेवा म्हणतात, मागणी घटल्यामुळे आणि पुरवठा वाढल्यामुळे कच्चं तेल ५५ डॉलरपर्यंत जाऊ शकतं. जर हे खरे ठरले, तर पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता आणखी वाढते.
पुढील मोठा निर्णय ५ मे रोजी
ओपेक+ देशांची पुढील बैठक ५ मे रोजी होणार आहे. या बैठकीत तेल उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला गेला, तर दर आणखी खाली जाण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाच्या घसरणीमुळे तुमच्या खिशाला लवकरच दिलासा मिळू शकतो. पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण यासाठी सरकारच्या निर्णयाची आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींची वाट पाहावी लागेल. दरम्यान, डोळे ठेवून बघा – पुढच्या काही आठवड्यांत तुमच्या पंपाच्या मीटरवर काही बदल दिसू शकतो.