मंडळी भारतीय कुटुंबांमध्ये सोने केवळ मौल्यवान धातू नाही, तर ते भावनिक नाते आणि आर्थिक सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. सण, समारंभ किंवा गुंतवणुकीचा निर्णय असो, बहुतांश लोकांसाठी सोने ही पहिली पसंती असते. गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या किमती सातत्याने वाढत होत्या आणि अनेक वेळा विक्रमी उच्चांक गाठण्यात आल्या होत्या. मात्र आता त्या किंमतीत घट झाली आहे, आणि त्यामुळे सोन्याची खरेदी करण्यास उत्सुक असलेल्या लोकांसाठी ही एक सकारात्मक बातमी ठरू शकते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. ऑपरेशन सिंदूर असे या कारवाईचे नाव असून, तिन्ही सैन्य दलांनी मिळून रात्री उशिरा एकत्रितपणे नऊ ठिकाणी लक्ष्यभेदी हल्ले केले. या कारवाईत ५० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. या घडामोडींमुळे जागतिक आणि स्थानिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे, ज्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर झाला आहे.
युद्धजन्य स्थिती, जागतिक बाजारात सुरू असलेली अनिश्चितता, अमेरिकन डॉलरची मजबूती आणि व्यापारी तणाव या सर्व घटकांचा परिणाम म्हणून आज सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही सर्वात मोठी घसरण असल्याचे बोलले जात आहे.
सध्या २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ₹९६,८९० आहे, तर २२ कॅरेट सोनं ₹८८,७५० दराने विकले जात आहे. जर भारत-पाकिस्तानमधील तणाव अधिक वाढला, तर तज्ज्ञांच्या मते सोन्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. काही अंदाजानुसार, भाव थेट ३० हजार रुपयांनी खाली येऊ शकतात.
अशा घडीला, जे लोक सोने खरेदी करण्याचा विचार करत होते, त्यांच्यासाठी हा योग्य क्षण असू शकतो. मात्र खरेदीचा निर्णय घेताना सध्याच्या घडामोडींचा नीट अभ्यास करून, बाजाराची स्थिती समजून घेणे महत्त्वाचे ठरेल.