मंडळी या वर्षी अक्षय तृतीया 30 एप्रिल 2025 रोजी आहे. हिंदू पंचांगानुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते. अक्षय या शब्दाचा अर्थ कधीही संपणार नाही असा होतो. त्यामुळे या दिवशी केलेल्या कोणत्याही शुभ कार्याला किंवा गुंतवणुकीला कधीही क्षय येत नाही, असे मानले जाते.
सोनं हे भारतीय संस्कृतीत केवळ ऐश्वर्याचं नव्हे तर सुरक्षित गुंतवणुकीचं प्रतीक मानलं जातं. ज्या काळात सोन्याचा शोध लागला, तेव्हापासून ते अमूल्य धातू म्हणून ओळखलं जातं. म्हणूनच अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.
गेल्या वर्षभरात सोन्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. 2024 च्या अक्षय तृतीयेला 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. दिवाळीनंतर सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आणि सध्या हा दर 96,000 रुपयांहून अधिक आहे. म्हणजेच एका वर्षात सुमारे 31 टक्क्यांचा परतावा मिळालेला आहे. पारंपरिक गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये ही वाढ उल्लेखनीय मानली जाते.
यावर्षीही सोन्याच्या दरात चढ-उतार दिसून आले. 16 एप्रिलला सोनं 990 रुपयांनी महागलं, 17 एप्रिलला आणखी 1,140 रुपयांची भर पडली, आणि 18 एप्रिलला 250 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोनं सध्या 89,600 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 97,730 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचला आहे.
चांदीबाबत बोलायचं झालं तर, काही काळापूर्वी ती 1 लाख 5 हजार रुपयांपर्यंत पोहचली होती. त्यानंतर किंमतीत घसरण झाली, पण आता पुन्हा एकदा चांदीने उसळी घेतली असून सध्या 1 किलो चांदी 1,00,000 रुपये इतकी आहे.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोनं 94,910 रुपयांवर, 22 कॅरेट 86,938 रुपये, 18 कॅरेट 71,183 रुपये, आणि 14 कॅरेट सोनं 55,522 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 95,151 रुपये प्रति किलो आहे.
वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कोणतेही कर किंवा शुल्क लागू होत नाही, त्यामुळे दर थोडेसे कमी असतात. मात्र सराफा बाजारात विक्री करताना कर आणि अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याने दरांमध्ये फरक दिसून येतो.
एकूणच, यंदाची अक्षय तृतीया सोन्यात गुंतवणुकीसाठी चांगली संधी देणारी ठरू शकते. मागील वर्षी मिळालेला चांगला परतावा पाहता, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे योग्य वेळ मानलं जात आहे.