नमस्कार मंडळी आजच्या घडीला जागतिक स्तरावर व्यापारी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामागचं प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राबवलेलं टॅरिफ धोरण. या धोरणामुळे अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्धासारखी स्थिती उद्भवली असून, इतर देशांवरचे आयात कर तात्पुरते थांबवले असतानाही चीनवरचा आयात कर तब्बल 125 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.
या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायाकडे वळताना दिसत आहेत आणि सोनं ही पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. परिणामी, सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरात तब्बल १०० डॉलर म्हणजेच सुमारे ८६०४ रुपयांची वाढ झाली आहे. एका दिवसातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ मानली जात आहे.
गुड रिटर्न्स गोल्ड या वेबसाईटनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९३३८० रुपये आहे, जो काल ९०४४० रुपये होता. म्हणजेच एका दिवसात २९४० रुपयांनी वाढ झाली आहे. एक ग्रॅम २४ कॅरेट सोन्यासाठी ग्राहकाला ९३३८ रुपये मोजावे लागतील.
दागिने बनवण्यासाठी वापरले जाणारं २२ कॅरेट सोनं देखील महागलं आहे. आज १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८५६०० रुपये इतका आहे, जो काल ८२९०० रुपये होता. यामध्ये २७०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना आज ८५६० रुपये मोजावे लागत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून स्पॉट गोल्ड ०.२ टक्क्यांनी वाढून प्रति औंस ३०८९.१७ डॉलर्सवर पोहोचले आहे. जगात जेव्हा अशा प्रकारची तणावपूर्ण स्थिती निर्माण होते, तेव्हा गुंतवणूकदार हमखास सोन्याकडे वळतात. गेल्या सलग पाच दिवसांत सोन्याच्या किमतीत घसरण झाली होती, मात्र आज या दरवाढीने बाजारात नव्याने चैतन्य निर्माण झालं आहे.