मंडळी सध्या सोन्याचे भाव प्रचंड वाढत असून, ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. आगामी अर्थसंकल्पात सोन्याच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही महत्त्वाच्या कारणांमुळे ही वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, सोनं लवकरच 85,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या उंचीवर पोहोचू शकते. चला, या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेऊ.
सोन्याचे दर वाढण्याची कारणे
1) सरकार आयात शुल्क पुन्हा वाढवू शकते. मागील वर्षी आयात शुल्क 15% वरून 6% करण्यात आले होते, ज्यामुळे सोन्याच्या किमती स्वस्त झाल्या आणि मागणी प्रचंड वाढली. मात्र, ही वाढलेली मागणी सरकारच्या आर्थिक तुटीवर भार ठरत आहे. त्यामुळे आर्थिक समतोल राखण्यासाठी सरकार पुन्हा आयात शुल्क वाढवू शकते, ज्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर होईल.
2) अमेरिकन धोरणात्मक निर्णय, ब्रिक्स देशांवरील कठोर भूमिका आणि जागतिक तणाव यामुळे आर्थिक बाजारपेठा अस्थिर झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे, ज्यामुळे दर चढत आहेत.
3) अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कमी केल्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. व्याजदर घटल्यामुळे सोनं कमी जोखमीच्या गुंतवणुकीसाठी एक आकर्षक पर्याय बनत आहे.
4) डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य सतत घसरत आहे. जानेवारी 2025 पर्यंत रुपया प्रति डॉलर 86.26 च्या पातळीवर पोहोचला आहे. रुपयाच्या अशा घसरणीमुळे सोन्याची आयात महाग होईल आणि परिणामी सोन्याच्या किमतींवर परिणाम होईल.
5) लग्नसराईच्या हंगामात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. याशिवाय, सोन्याच्या ईटीएफ गुंतवणुकीसाठी वाढलेली मागणीही दर वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे.
पुढील काळात सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता
जागतिक तणाव स्थानिक आर्थिक धोरणांतील अनिश्चितता आणि सरकारी धोरणांमुळे सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात. त्यामुळे सोनं खरेदी करताना बाजारस्थितीचा नीट अभ्यास करणे अत्यावश्यक आहे.