मंडळी मार्च महिन्यात सोन्याच्या दरांनी ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. तेव्हा सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी तब्बल 98,000 रुपयांपर्यंत पोहोचला होता. विशेष म्हणजे, चांदीचे दरही त्याच पातळीवर पोहोचले होते – एक किलोमागे 98,000 रुपये. अर्थात, दोन्ही धातूंच्या दरात फक्त मोजणीची पद्धत वेगळी होती.
मार्चमध्ये स्पॉट गोल्डने प्रथमच $3,000 चा टप्पा पार केला होता. एप्रिलमध्ये तर एका क्षणी सोन्याने $3,500 चा उच्चांक गाठला. मात्र त्यानंतर किंमतीत थोडी घसरण झाली असून सध्या सोनं $3,300 च्या खाली व्यवहार करत आहे – म्हणजेच उच्चांकाच्या तुलनेत सुमारे 6% घसरण.
तज्ज्ञांचा सोन्याबाबतचा विश्वास अद्याप टिकून आहे. Reuters च्या अलीकडील सर्वेक्षणानुसार, 2025 साठी सरासरी दर $3,065 प्रति औंस असेल, असा अंदाज 29 गुंतवणूक विश्लेषक व ट्रेडर्सनी वर्तवला आहे. मागील तिमाहीत हा अंदाज $2,756 इतका होता, म्हणजेच दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने अजूनही विश्वासार्ह पर्याय आहे.
2026 साठी देखील अंदाजे दर $3,000 च्या आसपास राहतील. याचा अर्थ, सध्याची किंमत घसरण ही तात्पुरती असून दीर्घकालीन दृष्टीने सोने अजूनही सेफ हेवन म्हणून पाहिले जात आहे. 2024 मध्ये सोन्याच्या किंमतीत सुमारे 27% वाढ झाली होती, तर 2025 मध्ये आतापर्यंत 25% इतकी वाढ नोंदवली गेली आहे. LSEG च्या आकड्यांनुसार, 2025 साठी आत्तापर्यंतचा सरासरी दर $2,952 आहे.
जागतिक अनिश्चितता आणि सोन्याचे महत्त्व
अमेरिका-चीन व्यापारी तणाव आणि विविध आंतरराष्ट्रीय घटनांमुळे अर्थव्यवस्थेत अनिश्चितता वाढली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ धोरणांमुळे गुंतवणूकदारांनी पारंपरिक गुंतवणूक माध्यमांपासून (जसे की शेअर बाजार व रिअल इस्टेट) दूर राहून सोन्याकडे वळण्याचा कल दर्शवला आहे. यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली असून $3,000 हा दर पुढेही टिकून राहण्याची शक्यता आहे.
गुंतवणुकीसाठी योग्य वेळ?
सध्या सोन्याच्या किंमती उच्चांकावरून थोड्या खाली आल्या असल्या, तरी त्या अजूनही मजबूत आधारावर आहेत. $3,000 हा दर तळरेषा मानला जात असल्यामुळे सध्याची किंमत बाय ऑन डिप्स च्या संधीप्रमाणे पाहिली जाऊ शकते. विशेषता 21 ते 55 वयोगटातील गुंतवणूकदारांसाठी हे योग्य वेळ मानले जात आहे, कारण पुढील काही महिन्यांत सोन्यात पुन्हा तेजी येण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत.