मंडळी मे 2025 महिन्याची सुरुवात सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक ठरली आहे. इंडियन ऑइलने आज जाहीर केलेल्या दरानुसार व्यवसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत सलग दुसऱ्या महिन्यात कपात करण्यात आली आहे. 19 किलो वजनाच्या व्यवसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 14.5 रुपयांची घट झाली असून ही दर कपात देशभरात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रमुख शहरांमध्ये त्याचा परिणाम जाणवू लागला आहे.
दुसरीकडे, घरगुती वापरासाठी असलेल्या 14.2 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेले काही महिने या दरात स्थिरता कायम आहे. त्यामुळे घरगुती वापरकर्त्यांना दिलासा मिळालेला नाही. मात्र व्यवसायिक वापरासाठी, विशेषता हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि छोट्या उद्योजकांसाठी ही कपात मोठा दिलासा मानली जात आहे.
दिल्लीमध्ये व्यवसायिक सिलेंडरचा दर आता 1747.50 रुपये झाला आहे, कोलकातामध्ये तो 1851.50 रुपये, मुंबईत 1699 रुपये तर चेन्नईत 1906.50 रुपये इतका झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत व्यवसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत एकूण 55.5 रुपयांनी घसरली आहे. मार्च 2025 मध्ये दिल्लीमध्ये ही किंमत 1803 रुपये होती, जी आता 1747.50 रुपये झाली आहे.
दर कपातीमागे जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण हे प्रमुख कारण आहे. सरकारकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला व्यवसायिक एलपीजी दरांचे पुनरावलोकन केले जाते. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर, मागणी-पुरवठा स्थिती आणि स्थानिक कर यांचा विचार केला जातो.
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात गेले काही महिने कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे अनेक घरगुती ग्राहकांना आशा आहे की लवकरच त्यांच्या वापरासाठी असलेल्या सिलेंडरच्या किमतीतही काही प्रमाणात कपात होईल.