मित्रांनो केंद्र सरकारने देशातील पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीत २ रुपये प्रति लिटर वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीत वाढ होईल, मात्र त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर ८ एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाढीचा प्रभाव काय?
एक्साईज ड्युटीतील वाढ लक्षात घेता पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे आहेत.
- नवी दिल्ली — ₹94.72 प्रति लिटर
- मुंबई — ₹104.21 प्रति लिटर
- कोलकाता — ₹103.94 प्रति लिटर
- चेन्नई — ₹100.75 प्रति लिटर
या दरात आणखी वाढ झाल्यास वाहतुकीच्या खर्चातही वाढ होईल आणि त्याचा परिणाम इतर वस्तूंच्या किमतींवरही होऊ शकतो.
एक्साईज ड्युटी म्हणजे काय?
एक्साईज ड्युटी म्हणजे केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर आकारला जाणारा उत्पादन शुल्क. सध्या पेट्रोलवर १९.९० रुपये आणि डिझेलवर १५.८० रुपये प्रति लिटर एवढं उत्पादन शुल्क आकारलं जात आहे. २०१४ साली हे शुल्क अनुक्रमे ९.४८ रुपये आणि ३.५६ रुपये होतं, मात्र ते नंतर सातत्याने वाढवण्यात आलं.
सरकारचा दावा
सरकारचा असा दावा आहे की, या दरवाढीमुळे मिळणारा निधी इन्फ्रास्ट्रक्चर आणि अन्य विकास योजनांसाठी वापरला जाईल. बजेटमध्ये घोषित केलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी हा निधी उपयुक्त ठरणार आहे.
ग्राहकांवर परिणाम होणार?
एकीकडे सरकार सांगत आहे की या वाढीचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने तेल कंपन्यांना दर वाढवू नये असे निर्देश दिल्याचे सांगितले आहे. परंतु कच्च्या तेलाच्या जागतिक किमतीत अस्थिरता असल्यामुळे भविष्यात इंधन दरवाढीचा फटका ग्राहकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.